मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोविडवरील लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना उपनगरीय लोकल मधून प्रवास करण्याची मुभा आहे. लस घेतलेल्या प्रवाशांना तिकीट तसेच पास मिळवण्यात होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन तसेच तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा अॅपच्या माध्यमातून तिकीट उपलब्ध करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. (Mumbai Local Train Uts App Update)
पूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासासाठी राज्य सरकारकडून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पास असेल तरच सध्या लोकलचं तिकीट वा पास दिला जात आहे. राज्य सरकारचं संबंधित अॅप आणि रेल्वेची यूनिव्हर्सल टिकिटिंग सीस्टीम अर्थात यूटीएस मोबाइल अॅप आता लिंक करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून लसीकरण झालेले प्रवासी यूटीएस अॅपच्या माध्यमातून लोकलचं तिकीट वा पास मिळवू शकणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी रेल्वेने आपलं यूटीएस मोबाइल अॅप लिंक केलं असून आता या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट तसेच पास उपलब्ध होईल. आज रात्रीच ही सुविधा आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे अगदी उद्यापासूनच या सेवेचा प्रवाशांना लाभ मिळेल. उद्याच्या प्रवासासाठीचे तिकीट प्रवासी आज रात्री काढू शकणार आहेत, असे लाहोटी यांनी नमूद केले. अँड्रॉइड फोनवर यूटीएस अॅप आधीच उपलब्ध आहे तर आयओएस अॅप आज रात्रीपासून सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment