भाजपा आमदार अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसची पोलिसांत तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2022

भाजपा आमदार अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसची पोलिसांत तक्रारमुंबई - मालाड पश्चिम येथील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी गदारोळ करून जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा नेते मंत्री अस्लम शेख व महापौरांना बदनाम करत आहेत. तसेच मुंबईतील दोन रस्त्याना टिपू सुलतान यांचे नाव देण्यासाठी भाजपा आमदार अमित साटम यांनी नगरसेवक असताना अनुमोदन दिले आहे. या कागदपत्रांना खोट ठरवून अमित साटम काँग्रेस आणि महापौरांची बदनाम करत असल्याने त्यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (Congress lodges police complaint against BJP MLA Amit Satam)

मालाड पश्चिम येथील एका मैदानाला मुंबईचे पालकमंत्री व काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी टिपू सुलतान यांचे नाव दिलं. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी मुंबईत गदारोळ करून जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुका व मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानच्या नावाने भाजप आज धर्माचे राजकारण करत आहे. याच भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी एम-पूर्व विभागातील एका रस्त्याला 'शहीद टिपू सुलतान मार्ग' असे नाव देण्याचा प्रस्ताव एम-पूर्व प्रभाग समितीत २६ जुलै २०१३ रोजी मांडला होता. तेथे तो मंजूर झाल्यानंतर २३ डिसेंबर २०१३ साली मुंबई महानगरपालिकेच्या सभेमध्ये ही तो प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सूचक म्हणून यशोधर फणसे आणि अनुमोदक म्हणून भाजपचे आताचे आमदार व त्यावेळचे नगरसेवक अमित साटम यांनी दिले होते, तसेच त्यावेळी भाजपचे २१ नगरसेवक उपस्थित होते.  २७ डिसेंबर २०१३ रोजी हा ठराव महानगरपालिकेत बिनविरोध मंजूर झाला होता. स्थापत्य समितीच्या सभेत ही प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याची अधिकृत व प्रमाणित प्रत देखील उपलब्ध आहे. ही वस्तुस्थिती असताना देखील भाजपचे आमदार अमित साटम यांनी ती प्रत खोटी असल्याचे सांगून मुंबई महानगरपालिकेची व काँग्रेसची बदनामी केलेली आहे. 

अमित साटम यांनी तणाव निर्माण करण्याच्या व लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवून जुहू पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली आहे. असे करून अमित साटम यांनी काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे आमदार व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची बदनामी केलेली आहे. एका लोकप्रतिनिधीने खोट्या माहितीचा प्रचार व प्रसार करणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे भाजप आमदार अमित साटम यांच्यावर ताबडतोब कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना अटक झाली पाहिजे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत भाई जगताप यांच्या सोबत मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे लीगल सेलचे कार्याध्यक्ष रवी जाधव, अध्यक्ष तुषार कदम व लीगल सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भाई जगताप पुढे म्हणाले की, भाजप आमदार अमित साटम व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची बदनामी केलेली असून सामाजिक शांतता दंगल भडकवण्याच्या उद्देशाने भंग केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करून समाजमाध्यम व पोलीस ठाण्यात खोट्या माहितीचा प्रचार व प्रसार करण्याचा मोठा कट रचलेला आहे. या कटामध्ये अनेक लोक सामील आहेत. त्यात मुख्य भाजपचे आमदार अमित भास्कर साटम व त्यांचे इतर सहकारी यांनी भा.दं.वि.१८६० कलम १२०बी, १५३ए, २११, ४९९, ५०४, ५०५२(२) सह ३४ व इतर कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा केलेला आहे. या संदर्भात आम्ही भाजपचे आमदार अमित साटम यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. त्यावेळेस माझ्यासोबत मुंबई काँग्रेस लीगल सेलची संपूर्ण टीम उपस्थित होती. या तक्रारीमध्ये अमित साटम व त्यांच्या सहकाऱ्यांवर परस्पर संगनमत करणे, कट रचून धार्मिक दोन गटांत दुश्मनी निर्माण करणे, खोटी तक्रार दाखल करणे, मानहानी करणे, जाणीवपूर्वक सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोट्या माहितीचा प्रचार व प्रसार करणे आणि दोन गटांत भांडणे होतील, तिरस्कार निर्माण व्हावा अशा पद्धतीने बोलणे, इत्यादी गुन्ह्यांसाठी ताबडतोब कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. अमित साटम यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुख्य नायाधीश मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांना सुद्धा पाठविण्यात आलेली आहे, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages