कामा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2022

कामा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू होणार



मुंबई - कोरोनामुळे कामा रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. येत्या आठ ते दहा दिवसांत या शस्त्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेवेळी आवश्यक असणारी औषधे व उपकरणेही उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.
 
मुंबईतील महिला व मुलांसाठी प्रसिद्ध असलेले कामा रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कामा रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने जानेवारी २०२२ पासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालय हे कोविड समर्पित करण्यात आले तर कामा रुग्णालयातही महिला रुग्णांना दाखल करण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मोठ्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या. ज्या रुग्णांवर औषधोपचाराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य आहे, अशा रुग्णांना कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बोलवण्यात येत होते. काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने मुंबईसह राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. ही बाब लक्षात घेता आता कामा रुग्णालयातील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यापासून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेवेळी आवश्यक असणारी औषधे व उपकरणेही मागवण्यात आली आहेत. ओपीडीमध्ये येणार्‍या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वेळ देण्यात येणार असून, त्याद़ृष्टीने शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad