प्रकल्पग्रस्तांसाठी वरळीत उभारणार ५२९ घरे, कंत्राटदाराला ५५० कोटी रुपये मोजणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रकल्पग्रस्तांसाठी वरळीत उभारणार ५२९ घरे, कंत्राटदाराला ५५० कोटी रुपये मोजणार

Share This


मुंबई -  मुंबई महापालिकेचा मुलुंड पूर्व आणि भांडुप पश्चिम येथील प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्याच्या  निर्णयानंतर आता वरळीत प्रकल्पग्रस्तांसाठी ५२९ घरे बांधली जाणार आहेत. पालिका प्रत्येक घराच्या बांधकामासाठी ८५ ते ९० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे सुमारे ५५० कोटी रुपये पालिका कंत्राटदाराला मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
                  
प्रकल्पग्रस्तांसाठी पालिकेने घरांची योजना आखली आहे. यापूर्वी मुलुंड पूर्व आणि भांडुप पश्चिम येथील प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आता वरळीत प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधली जाणार आहे. पालिकेच्या सात परिमंडळात प्रत्येकी पाच हजार घरे उभारली जाणार आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी एकूण ३५ हजार घरे बांधणीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मागील आठवड्यात सुधार समितीच्या बैठकीत मुलुंड आणि भांडुपमधील साडेनऊ हजार घरांचा सुमारे ३५०० कोटींचा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आला. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला होता. त्यानंतर आता वरळी येथील प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. यासाठी क्लासिक प्रमोटर्स या एकमेव बिल्डरची निविदा आली होती. त्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
एका घराच्या बांधकामासाठी बिल्डरने एक कोटी १३ लाख रुपये खर्चाची मागणी पालिकेकडे केली होती. पालिकेने ८५ ते ९० रुपये खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या आठवड्यात मंजूर झालेल्या मुलुंड आणि भांडुप येथील बांधकामासाठी प्रती घर ३८ ते ४० लाख रुपये खर्च पालिकेने संबंधित बांधकामदाराला दिला आहे. या पार्श्वभूमीवर वरळीतील बांधकाम खर्च दुपटीपेक्षा अधिक होत असल्याने विरोधकांकडून प्रस्तावाला विरोध करण्याची शक्यता आहे. 

पालिकेने या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटींचा कार्यालयीन अंदाज व्यक्त केला होता. मात्र बिल्डरने बांधकामाचा दर वाढवून मागितल्यामुळे हा खर्च आता ५५० कोटींवर पोहोचला आहे. दरम्यान एकच निविदा आलेल्या कंत्राटदाराला काम देणे योग्य नाही. पालिका निविदांबाबत असलेल्या नियमावलीचे पालन करत नाही, असा दावा पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला असून या प्रस्तावाला तीव्र विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages