मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहे, असा ठराव मंजूर करण्यात आला. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी हा ठराव मांडला व सर्वांनी एकमताने तो पारित केला.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसचे मंत्री, आमदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, व प्रदेश काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतोखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धनमंत्री अस्लम शेख, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, AICC चे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, आशिष दुआ, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतक-यांची वीज कनेक्शन न तोडण्याचा व तोडलेली कनेक्शन पुन्हा जोडण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला व तोही एकमताने पारित करण्यात आला.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना बैठकीत दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
No comments:
Post a Comment