मुंबईकरांना खुशखबर - उद्या (१ एप्रिल) पासून मास्क न वापरल्यास दंड नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2022

मुंबईकरांना खुशखबर - उद्या (१ एप्रिल) पासून मास्क न वापरल्यास दंड नाही



मुंबई - संपूर्ण जगभरात कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव सन २०२० च्या सुरुवातीपासून सुरु झाला होता. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्याकरिता वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या आणि विविध निर्णय घेतले होते. तोंडावर मुखपट्टी अर्थात मास्क परिधान केल्याने कोरोना पासून स्वतःचा बचाव होतो तसेच प्रसार थांबतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्देश दिल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे महानगरपालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मास्कचा वापर न केल्यास दंड म्हणून २०० रुपये नागरिकांकडून आकारण्यात येत होते. या निर्णयाचे जे नागरिक अनुपालन करणार नाहीत त्यांच्यावर मनपा कर्मचारी - अधिकारी, मुंबई पोलीस तसेच खासगी सुरक्षा रक्षक (क्लिन अप मार्शल ) संस्था यांच्यामार्फत २०० रुपये दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला जात होता.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार आटोक्यात येत असल्याने कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेली बंधने शिथिल करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई परिसरात  नागरिकानी मास्क न वापरल्यास यापूर्वी केली जात असलेली २०० रुपयांची दंडात्मक कार्यवाही आता उद्या दिनांक १ एप्रिल २०२२ पासून बंद करण्यात येत आहे. मात्र, संपूर्ण जगात कोरोनाचा धोका अजूनही पूर्णतः टळला नाही. आरोग्याची खबरदारी म्हणून नागरिकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मास्क परिधान करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad