बाळासाहेबांच्या मुंबापुरीत भाजपाची अनधिकृत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही - शितल म्हात्रे


मुंबई - भाजपच्यावतीने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल (Bjp Polkhol Sabha) करण्यासाठी प्रत्येक विभागात जाहीर सभा घेतली जात आहे. कांदिवली आणि चेंबूर येथील पोलखोल अभियानाच्या प्रचार रथाची तसेच व्यासपीठाची सभेपूर्वीच काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार ताजा असतानाच आज (२० एप्रिल २०२२) बुधवारी दहिसर पूर्व येथे सभा होण्यापूर्वीच दुपारी स्टेज बांधण्याचे काम सुरू असताना शिवसैनिकांनी तो स्टेज बेकायदेशीर असल्याचे सांगत काढून टाकला आहे. यावेळी बाळासाहेबांच्या मुंबापुरीत भाजपाची (Bjp) अनधिकृत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी दिला आहे. (Dadagiri of BJP will not be tolerated in Balasaheb's Mumbai)


आज संध्याकाळी ६ वाजता दहिसर पूर्व येथील नवागावमधील  मस्करन्स वाडीत भाजपची पोलखोल सभा होणार होती. त्यामुळे दुपारी रस्त्यावर स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. व त्यावर माजी नगरसेवक जगदीश ओझा व इतर भाजप कार्यकर्ते देखरेख करीत होते. इतक्यात दहिसरमधीलच शिवसेनेच्या माजी नगरसेविका व प्रवक्त्या शितल म्हात्रे या काही शिवसैनिकांना घेऊन तेथे धडकल्या. सभेची पालिकेकडून परवानगी घेतली का? परवानगी दाखवा? अशी विचारणा भाजप कार्यकर्त्यांकडे केली. पण त्यांच्याकडे पालिकेची परवानगी नव्हती. हा स्टेज बेकायदेशीर बांधत असून तो काढून टाका असा आदेश शीतल म्हात्रे यांनी शिवसैनिकांना दिला. शिवसैनिकांनी ताबडतोब स्टेज काढण्यास सुरुवात केल्यावर शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आम्ही परवानगी घेतली नाही.ती कशाला घ्यायची? असा सवाल एक भाजप कार्यकर्ता शीतल म्हात्रे यांना करत होता. तुम्ही पालिकेकडे आमची तक्रार करा असेही त्या कार्यकर्त्याने म्हात्रे यांना सांगितले. यावरून संतापलेल्या शिवसैनिकांनी स्टेज काढण्यास सुरुवात केली. भाजप कार्यकर्ते त्यांना अडवत होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांना न जुमानता स्टेज काढून टाकला.  
      
दादागिरी खपवून घेणार नाही - 
या संदर्भात माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, दहिसर प्रभाग क्रमांक ७ येथील नवागाव परिसरात भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल या कार्यक्रमाच्या सभेची अनधिकृतपणे तयारी सुरु होती. या ठिकाणी जाऊन आम्ही परवानागी दाखविण्यास सांगितली असता त्याला न जुमानता भाजपाकडून तयारी सुरु होती. या गोष्टींना आळा घालण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पोलीस आणि महापालिकेच्या सहाय्याने त्यांचा सभा मंच आणि इतर तयारी उधळून लावण्यात आली.  
बाळासाहेबांच्या मुंबापुरीत भाजपाची अशी अनधिकृत दादागिरी खापवून घेतली जाणार नाही असे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे. 

परवानगी शिवाय सभा नको -
भाजपाच्या पोल खोलसभांमुळे कायदा सुव्यस्थेस धोका निर्माण होत आहे. पोलिसांच्या रीतसर परवानगी शिवाय अशा प्रकारच्या सभा होण्यास बोरीवली, दहिसर, मागठाणे परिसरात बंदी घालावी ह्या मागणी साठी शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस व आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसेना शिष्टमंडळासह पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक जगदीश ओझा यांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

Post a Comment

0 Comments