
मुंबई - मोबाईल, टॅबलेट, संगणक व इतर गॅजेट्समुळे आभासी विश्वात हरवत चाललेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी मुंबईतील पालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत प्रत्येकी एक प्रमाणे २४ उद्यानांत मोफत वाचनालयाची सुरुवात सामाजिक दायित्वातून करण्यात येत आहे. मुंबईतील उद्याने सुशोभित आणि विविध सुविधांनी सुसज्ज केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांची पावले उद्यानांकडे वळावीत, यासाठी विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क अशा प्रकारच्या महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर बांधलेली वास्तू (Built up Structure), गजेबो (Gazebo) उपलब्ध आहेत. अशा उद्याने आणि जागांमध्ये योग्य अशा ठिकाणी छोटेखानी कपाट ठेऊन त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, ग्रंथ ठेवण्यात येत आहेत. उद्यानास भेट देणाऱया नागरिकांना सदर वाचन साहित्य मोफतपणे वाचणे शक्य होईल. वाचन झाल्यानंतर सदर साहित्य उद्यानांमधील कपाटांमध्येच परत ठेवले जाईल. आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्यक्ष वाचन साहित्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, संगणक इत्यादी उपकरणांच्या (Screen Devices) आभासी विश्वात युवा पिढी हरवत चालली आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना तणावमुक्त होता यावे, त्यासोबतच त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हा यामागील उद्देश आहे. लुप्त होत चाललेल्या वाचनालय संस्कृतीस संजीवनी प्राप्त करून देण्याकरीता हा उपक्रम योगदान देऊ शकेल. प्रत्येक विभागातील एक उद्यान अशा प्रकारे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

No comments:
Post a Comment