मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी - नारायण राणे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी - नारायण राणे

Share This


मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले हे एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. माजी आमदार व भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार या वेळी उपस्थित होते.

राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत आपल्या सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरीविषयी बोलणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत राज्यातील सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दमडीही दिली नाही. घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील वेगवेगळया समाज घटकांच्या वेदना, व्यथा कळल्याच नाहीत. आपल्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही हे ठाऊक नाही हे माहिती असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी असभ्य, शिवराळ भाषेचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेवर आल्यावर किती रोजगार दिले याचा हिशोब सांगण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या शिवसेनेने आता मोदी यांच्यावर टीका करून आपला विश्वासघातकी चेहरा दाखविला आहे, असेही राणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages