देहविक्रीला व्यवसाय म्हणून मान्यता द्या - अमृता फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2022

देहविक्रीला व्यवसाय म्हणून मान्यता द्या - अमृता फडणवीस


पुणे - भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या पुण्यात शनिवारी दुपारी बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी देहविक्री व्यवसायातील महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

“मी सरकारला असेच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्वीकारले पाहिजे. जर्मनीसारख्या देशामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांना आदराचे स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकते. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

“योगा करणे सर्वांना गरजेचे आहे. तुम्ही सर्वजण तयार असाल तर मी तुमच्यासाठी चांगले प्रशिक्षक आणून तुमचे योगा सेशन घेईन. तुम्ही हा योगा घरी केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तंदुरुस्त राहाल. आम्ही बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवे तिथे योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ,” असे त्यांनी सांगितले.

देहविक्री व्यवसायातील महिलांनी दैनंदिन वैद्यकीय तपासणी करावी -
“तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे,” असे त्या म्हणाल्या.

आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका ! -
“आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका,” असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad