प्लास्टिक कारवाई - आठवडाभरात १९५ किलो प्लास्टिक जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2022

प्लास्टिक कारवाई - आठवडाभरात १९५ किलो प्लास्टिक जप्त


मुंबई - मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. एका आठवड्यात सहा हजार ठिकाणी भेटी देऊन १९५ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तर २ लाख ६० हजार इतकी दंडवसुली करण्यात आली आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून प्लास्टिक विरोधी कारवाई थंडावली होती. सद्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई सुरु केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्या दुकाने, मॉल्स, फेरीवाले यांच्या विरोधात कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने ५८ लोकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. आठवडाभरात १९५ किलो प्लास्टिक जप्त केले असून २ लाख ६० हजार दंडवसुली केली आहे. प्लास्टिक विरोधात कारवाई येत्या काही दिवसांमध्ये आणखी तीव्र केली जाणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डच्या पातळीवर मर्यादित अशा मनुष्यबळाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. पण आगामी कालावधीत मात्र दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोठ्या टीमसह छापेही टाकण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक वापरणाऱ्यांविरोधात ही कारवाईची मोहीम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या लायसन्स विभागाकडून ही कारवाई शहरभर सुरू आहे. त्यामध्ये मार्केट आणि शॉप्स विभागाचेही लोक कारवाई करत आहे. येत्या दिवसांमध्ये आणखी कर्मचारी वर्ग या मोहिमेत सहभागी होणार आहे. त्यामुळे कारवाईला वेग येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, वाहतूक, विक्री, साठवणूक, हाताळणी व वापरास पूर्णपणे बंदी आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर कोणीही करु नये, अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad