मुंबई - मुंबई व उपनगरांत गुरुवारी पहिल्याच पावसाने मुंबईकरांना झोडपून काढल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पावसाने संततधार कायम ठेवत जोरदार बरसला. त्यामुळे पुन्हा सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अंधेरी सबवेत पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली. मात्र दुपारनंतर पाऊस काहीसा ओसरल्याने पाण्याचा निचरा झाला. रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनीटे उशिराने धावत होत्या. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक जाम झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईकरांचे दुस-या दिवशीही हाल झाले. पावसाच्या सुरुवातीलाच पडझड सुरु झाली आहे. पेडर रोड येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. दरम्यान येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जून संपता संपता मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावत गुरुवारी दिवसभर संततधार कोसळल्याने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले. शुक्रवारीही पावसाने आपली बॅटिंग कायम ठेवत जोरदार कोसळला. अंधेरी सबवेत पाणी तीन फूट पाणी साचल्याने हा सबवे दुपारी साडेतीन वाजता बंद करण्यात आला. मात्र पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हा सबवे खुला करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना येथील वाहतूक कोंडीला दुस-या दिवशीही सामोरे जावे लागले. चेंबूर, टिळक नगर, कुर्ला, दादर, हिंदमाता, गांधी मार्केट, वांद्रे आदी भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर काही वेळ विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा झाला. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक जाम झाली होती. पावसाच्या संततधारेमुळे पाणी साचून मुंबई ठप्प होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने पंप लावण्यात आले होते. मात्र सलग दोन दिवस पावसाच्या संततधारेमुळे मुंबईकरांचे हाल झाले.
पेडर रोड येथे दरड कोसळली -
मुंबईत पावसाच्या सुरुवातीलाच पडझडींना सुरुवात झाली आहे. रिपरिप पावसांतही वांद्रेत घर कोसळून एकाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवार, शुक्रवारच्या पावसांत पेडररोड येथील दरड कोसळली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान पेडर रोड येथील एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना येथील दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटना स्थळाला जिऑलॉजिस्ट भेट देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment