मुंबई - दहीहंडीचे मानवी मनोरे रचताना अपघात होवू नये अशी अपेक्षा असते. मात्र, काहीवेळा अपघाताने थरावरचे गोविंदा खाली पडून जखमी होतात. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. तर काही मृत्यूमुखीही पडतात. या पार्श्वभूमीवर मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील गोविंदांना सुरक्षा देण्यासाठी १० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अधिकाधिक गोविंदांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत दहीहंडी जल्लोषात साजरी केली जाते. यामध्ये गोविदांच्या सुरक्षेचा मुद्दा दरवर्षी उपस्थित केला जातो. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूही होतो. अशा गोविंदांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी भाजपाने ‘विमा सुरक्षा कवच’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेनुसार जर दहीहंडीवेळी गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आणि कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास १० लाख रुपये तसंच अपघातामुळे रुग्णालयातील खर्च १ लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. या विम्याची मुदत १९ ऑगस्ट या दिवसभरासाठी असेल. ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून दादर वसंत स्मृती येथील भाजपा कार्यालयात जमा करावीत असे आवाहन मुंबई भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment