शिंदे गटाने वाद घालण्यापेक्षा दुसरा पक्ष स्थापन करा - शरद पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2022

शिंदे गटाने वाद घालण्यापेक्षा दुसरा पक्ष स्थापन करा - शरद पवारबारामती - धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, उगाच वाद घालण्यापेक्षा शिंदे गटाने दुसरा पक्ष स्थापन करावा, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मांडली.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरा पक्ष काढायचा असेल तर ते जरूर काढू शकतात, दुसरे चिन्हही ते घेऊ शकतात, मी देखील काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही नवीन पक्ष स्थापन केला, घड्याळ हे चिन्ह घेतले, आम्ही वाद वाढवला नाही, पण धनुष्यबाणाबाबत काही ना काही काढून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोकच त्याला पाठिंबा देणार नाहीत.

‘हर घर तिरंगा’ हा देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हाती घेण्यात आलेला उपक्रम आहे, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, देशाभिमानाची बाजू यात असल्याने आमची या उपक्रमाला साथ आहे, अशा शब्दांत या उपक्रमाची पाठराखण शरद पवार यांनी केली.

लोकसभेचे अधिवेशन चालविण्याबाबतची आस्था केंद्र सरकारमध्ये गेल्या काही वर्षांपासून आहे असे आम्हाला जाणवत नाही, ज्या वेळेस सरकारला संधी मिळते तेव्हा ते अधिवेशन बंद करतात, चर्चेचा मार्ग बंद करतात, लोकांना आपली मते मांडायची संधी मिळते, ती थांबवतात आणि आपल्याला हवे तसे काम करतात. त्याचाच नमुना काल लोकसभा व राज्यसभेतही पाहायला मिळाला, या शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

भाजप मित्रपक्षांना संपवतेय -
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता.

प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेक वर्षे एकत्र होते. आज भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे? भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad