महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत घोटाळा, भाजपची चौकशीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2022

महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत घोटाळा, भाजपची चौकशीची मागणीमुंबई - मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतची निविदा काढण्यात आली, मात्र यात पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आणि तांत्रिक सल्लागाराच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेच्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला कंत्राट मिळावे अशाप्रकारे होत्या. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक बाब असल्याने त्या विषयातील तज्ञ व तांत्रिक दृष्टया सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते. परंतु त्या कंपनीकडे सदर कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकुणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो. सदर निविदेबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी ,तांत्रिक सल्लागार आणि सदर कंपनीचे अधिकारी यांच्यात वारवांर संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालणारे आहेत, त्याबाबतच्या तक्रारी आपल्याला तसेच लाचलुचपत विभागकडेही करण्यात आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेर निविदा काढण्यात यावी अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad