मढ येथील अवैध स्टुडिओंवर पालिकेचा हातोडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2022

मढ येथील अवैध स्टुडिओंवर पालिकेचा हातोडा



मुंबई - मालाड, मढमध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अवैध स्टुडिओंवर मंगळवारी मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. येथील मिलेनियर सिटी आणि एक्सप्रेशन या दोन स्टुडिओवर हातोडा चालवण्यात आला आहे. पालिका येत्या काही दिवसात आणखी काही स्टुडिओंवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या गावांमध्ये मागील वर्षभरात पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून 'ना विकास क्षेत्र', 'सीआरझेड'मध्ये सुमारे ४९ स्टुडिओ तसेच इतर काही बांधकामे करण्यात आल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची पालिकेने दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या मालाड पी-उत्तर विभाग कार्यालयाने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) शिफारशीसापेक्ष तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र प्राधिकरणाकडून कोणतीही परवानगी न घेताच हे स्टुडिओ चालवले जात होते. हे स्टुडिओ अवैध पद्धतीने बांधण्यात आले आहेत का, याची चौकशी पालिका करणार आहे. यासाठी उपायुक्त हर्षद काळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ७ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये पालिकेच्या पी उत्तर विभाग सहाय्यक आयुक्तांना सीआरझेड-३ मध्ये येत असलेल्या स्टुडिओंच्या बांधकामांबाबत नियमांनुसार केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले होते. या अहवालानंतर पालिकेने मंगळवारी ही कारवाई सुरू केली आहे. स्टुडिओच्या परवानगीच्या नूतनीकरणासाठी एमसीझेडएमए, पर्यावरण विभागाकडून मिळालेल्या शिफारसपत्राची प्रत पालिकेला सादर करण्याची मुदत स्टुडिओ चालकांना देण्यात आली होती. मात्र संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पी - उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

दरम्यान पी - उत्तर विभाग कार्यालयामार्फत स्टुडिओ चालकांना लेखी नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात २ मार्च २०२१ रोजी देण्यात आलेली तात्पुरती परवानगी व नूतनीकरण रद्द करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. स्टुडिओ चालकांनी स्वतःहून बांधकामे पाडावीत तसे न केल्यास पालिकेकडून ती बांधकामे पाडण्यात येतील व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने या नोटिसांमध्ये दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad