दसरा मेळावा - शिवाजी पार्कचा निर्णय याच आठवड्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2022

दसरा मेळावा - शिवाजी पार्कचा निर्णय याच आठवड्यात



मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर राजकीय वाद सुरु आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटानेही अर्ज केला आहे. या अर्जांवर पालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय घेतला जात आहे. विधी विभागाच्या अभिप्रायानंतर याच आठवड्यात पालिका आयुक्तांकडून याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बीकेसी मैदानात दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीएकडून शिंदे गटाला परवानही मिळाली आहे, तर शिवसेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र शिवसेना तसेच शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठीचा दावा कायम आहे. पार्क मैदानासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबतची सर्व कागदपत्रे पालिकेच्या विधी विभागाकडे पाठविली आहेत. तर शिवसेनेने परवानगी न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कच्या परवानगीचा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.

शिवाजी पार्क कोणाला द्यायचे याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून चालू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने या मैदानासाठी दावा केल्यामुळे पालिकेची अडचण वाढली आहे. त्यामुळे पालिकेने हे मैदान कोणाला द्यायचे याबाबत पडताळणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने हा प्रश्न विधी विभागाकडे सोपविला आहे. विधी विभागाचा अभिप्राय मिळाल्यानंतर मैदान कोणाला द्यायचे यावर निर्णय होईल अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

प्रशासक नियुक्त होण्यापूर्वी पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. आता प्रशासक नेमल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने पालिकेवर त्यांचा वचक आहे. मात्र शिवसेना मागील ५६ वर्षापासून या मैदानावर दसरा मेळावा घेत आली आहे. शिवाय यंदा परवानगीसाठी पहिला अर्ज शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मैदान कुणाला असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.

मात्र विधी विभागाच्या अभिप्रायानंतरच यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असून विधी विभाग याच आठवड्यात आपला अभिप्राय देण्याची शक्यता आहे. विधी विभागाच्या अभिप्रायासह अहवाल पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे पाठवला जाईल व त्यानंतर आयुक्त दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याचा निर्णय जाहीर करतील. दरम्यान शिवाजी पार्क कुणालाही न मिळाल्यास राजकीय वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad