मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत लक्ष वेधूनही प्रशासनाकडुन दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत. पुरेसा औषधसाठा नाही, रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नाहीत, कर्मचा-यांची कमतरता आहे. सिटीस्कॅन, एमआरआयसह महत्त्वाच्या चाचण्याही वेळेत होत नाहीत. तर काही महत्त्वाचे विभाग बंद आहेत, अशा तक्रारी करूनही याबाबत रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालय ओळखले जाते. दक्षिण मुंबईत केईएमनंतर ते महत्त्वाचे रुग्णालय असून मुंबईसह राज्याच्या कानाकोप-यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. या रुग्णालयाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून ढासळत चालला आहे. त्याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस नेते व पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी डॉ. संजीव कुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नायर रुग्णालयातील गैरव्यवस्थापनाच्या अनेक तक्रारी येत आहेत. आयसीयू, रेडिएशन, न्यूक्लियर मेडिसिन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सेवा ब-याच काळापासून बंद आहेत.. सीटीस्कॅन आणि एमआरआय मशीन बहुतेक वेळा दुरुस्तीच्या कामात असतात. रुग्णांना वेळेत चाचण्या होत नाहीत. ब-याच महिन्यानंतर तारखा दिल्या जातात. रुग्णालयात मूलभूत औषधे, ड्रेसिंग साहित्य, प्लास्टर उपलब्ध नसल्याचीही समस्या आहे, असा आरोपही निकम यांनी केला आहे. कार्डिओ सर्जरी विभागात डॉक्टर तसेच तांत्रिक कर्मचार्यांची कमतरता आहे. कर्मचा-यांच्या पदोन्नती प्रलंबित आहेत. वसाहत समिती, कॅन्टीन समिती, हॉस्टेल समिती, बालरोग विभाग समित्यांवर सदस्य नियुक्त्याही प्रलंबित असल्याचे निकम यांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment