गरिबाला स्वस्त गॅस, रेशन नाही; मेडशीच्या महिलांची व्यथा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2022

गरिबाला स्वस्त गॅस, रेशन नाही; मेडशीच्या महिलांची व्यथा


वाडेगाव (जिल्हा अकोला) - "गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ?" हा प्रश्न आहे मेडशीच्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडलेला. त्या शेतमजूर आहेत. अशिक्षित आहेत. राजकारणाशी संबंध नाही. पण राहुल गांधी यांचे भाषण ऐकायला उपस्थित होत्या. 

रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला जातो. पण सरकारने आमचे रेशन बंद केले आहे. आता गहू, तांदुळ, ज्वारी सगळंच महागलेय. गळ्यातले सोने ठेऊन आम्ही गॅस सिलेंडर घेतला होता. स्वस्तात गॅस मिळेल अशी आशा होती. पण गॅस 1200 रुपये झाला. दिवसभर कष्ट करून रोज दोनशे कमवणारे गॅस घेऊ शकत नाहीत. आता पुन्हा आम्ही चूल पेटवली आहे. म्हणून गरिबाला रेशन आणि गॅस स्वस्तात मिळायला हवा, असे त्या म्हणाल्या. मेडशीत अनेक महिलांची अशीच स्थिती. येथील 80 टक्के कुटुंबे शेतमजुरीवर गुजरण करतात. त्यांना राहुल गांधी गरिबांसाठी काहीतरी करतील याची खात्री आहे.

भारत जोडो यात्रा बुधवारी रात्री अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता पातूर येथून सुरू झालेली यात्रा चेंन्नी फाटा, वाडेगाव येथे दुपारची विश्रांती घेऊन संध्याकाळी वाडेगाव, बाळापूर येथे मुक्कामी पोहोचली. बुधवारी रात्री मेडशी (वाशीम) येथे तुफान गर्दी झाली होती. तर मेडशी ते पातूर सुमारे 18 किलोमीटरचे जंगल क्षेत्र वाहनाने पार केल्यानन्तर पातूर येथे मुकाम झाला. 

पातूर येथून पहाटे मोठ्या जल्लोषात यात्रेला प्रारंभ झाला. सोलापूर, सांगली, यवतमाळ आणि नागपूर येथील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. दुपारी वाडेगाव मध्ये राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. ज्ञानेश्वर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि देशभक्तीपर गीतांनी राहुलजींचे स्वागत केले. तर भारडे कुटूंबियांच्या इमारतीच्या छतावर अनेक महिला उभ्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या छतावर गेले. मग त्यांच्या आंनदाला पारा उरला नाही.

वाडेगाव ते बाळापूर दरम्यान दुपारच्या सत्रात बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या जयश्री थोरात पदयात्रेत सहभागी झाले होते. मेधाताई पाटकर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यासह पदयात्रेत चालत होत्या. तर सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad