राज्याचे धोरण उद्योगस्नेही, स्थानिकांच्या रोजगार संधीला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2022

राज्याचे धोरण उद्योगस्नेही, स्थानिकांच्या रोजगार संधीला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री


मुंबई - आपल्या राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच आहे. त्यासाठी उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्यच केले जाईल. पण उद्योगांनीही स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स – (आर.सी.एफ.) कंपनीच्या थळ येथील विस्तारीत प्रकल्पाबाबत आणि डोलवी (ता.पेण) येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहूल शेवाळे, आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह आरसीएफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेरीकर तसेच वाडवली गाव, न्यू कफ परेड परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकार उद्योगांच्या विकास आणि विस्ताराला पूर्ण सहकार्यच करेल. तसे आपले धोरण आहे. कंपन्याचा विस्तार व्हावा, गुंतवणूक वाढ व्हावी. तसेच रोजगाराच्या संधी वाढव्यात असेच प्रयत्न आहेत. पण उद्योगांनीही प्रकल्पबाधितांना नोकऱ्या देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. जास्तीत जास्त प्रकल्पबांधितांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावे, असे प्रयत्न करावेत. हे भूमिपुत्रच उद्योगांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून येतात. म्हणून त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्या हितांच्या गोष्टींनाही प्राधान्य दिले जावे. काही अडचणी, प्रश्न असतील, त्यावर सामंजस्याने, चर्चेने तोडगा काढता येईल. सुवर्णमध्य साधता येईल. यादृष्टीने परस्परांना सहकार्य केले जावे. सुरवातीपासून आपल्याकडे असे उद्योगस्नेही धोरण आणि पोषक वातावरण राहीले आहे. सरकार म्हणून आम्ही उद्योगांच्या विकासात त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत. त्यासाठी उद्योगांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही सर्व विभागांना दिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

आर.सी.एफ.च्या विस्तारात प्रकल्पबाधितांच्या प्राधान्यासाठी प्रयत्न -
थळ येथील विस्तारात स्थानिक १४१ प्रकल्पबाधितांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी आरसीएफच्यावतीने आणि राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आरसीएफ त्यांच्या केंद्रीय यंत्रणांकडून याबाबत मार्गदर्शन घेणार आहे. राज्य शासनाच्यावतीनेही केंद्रीय उद्योग मंत्रालयाला आरसीएफच्या मधील या प्रकल्पबाधितांना सामावून घेण्याबाबत पत्र देण्यात येणार आहे. वाडवली गाव येथील मंदिर, मैदानांची सुविधा उपलब्ध व्हावी आणि आरसीएफने अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर अतिक्रमण हटवण्याबाबतही चर्चा झाली. आरसीएफच्या मुंबईतील प्रकल्पामुळे न्यू कफ परेड येथील रहिवाशांना होणारा प्रदूषणाचा त्रास रोखण्यासाठी, प्रदुषण नियंत्रणाची मानकांचे काटेकोर पालन तसेच प्रदूषण रोखणारी रिअल टाईम यंत्रणा बसवण्याचे निर्देश देण्यात आले.

जेएसडब्लू प्रकल्पात स्थानिकांच्या भरतीबाबत समन्वय -
डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू च्या प्रकल्पात स्थानिकांच्या भरतीबाबतही लवकरच जाहीरात काढण्यात येईल. बंद झालेल्या प्रकल्पातील १२६ उमेदवारांना लवकरच नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. भरतीबाबत आणि स्थानिक उमेदवारांच्या भरतीबाबत विविध विभागांनी कंपनीशी समन्वय साधण्याचे कंपनीच्या विस्तार आणि विकासासाठी सहकार्य करण्यात यावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad