गोवर लसीकरणासाठी कंत्राटी तत्‍वावर होणार लसटोचकाची नियुक्‍ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोवर लसीकरणासाठी कंत्राटी तत्‍वावर होणार लसटोचकाची नियुक्‍ती

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीने राबविण्यात येणारी नियमित लसीकरण व विशेष लसीकरण मोहिमेसाठी कंत्राटी स्वरुपात लसटोचकांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यात निवृत्त सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहायक आरोग्य प्रसविका यांना देखील त्यात सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्र राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकेत आरोग्‍य केंद्र, दवाखाने, प्रसुतिगृहे हे सर्वसामान्‍य रुग्‍णालय व वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नियमित लसीकरण कार्यक्रम मोफत राबविण्‍यात येतो. नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगट तसेच १० वर्ष, १६ वर्ष व गर्भवती महिलांचे लसीकरण करण्‍यात येते. आरोग्‍य केंद्रातील सहायक आरोग्‍य प्रसविकामार्फत आरोग्‍य केंद्रात व आरोग्‍य केंद्रातील कार्यक्षेत्रामध्‍ये क्षेत्रीय लसीकरण राबविण्‍यात येते.

सद्यस्थितीत ऑक्‍टोबर २०२२ पासून गोवर आजाराच्‍या रुग्‍णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. ही बाब लक्षात घेता नियमित लसीकरण तसेच क्षेत्रीय लसीकरण गतिमान करण्‍यासाठी व लसीकरणातून वंचित राहिलेल्यांचे गोवर लसीकरण करण्यासाठी, त्याचप्रमाणे गोवर रुग्ण अधिक असलेल्‍या भागातील आरोग्‍य केंद्रात विशेष लसीकरण मोहीम राबविण्‍यासाठी सर्व २४ विभागातील आरोग्‍य केंद्र स्‍तरावर लसटोचकाची कंत्राटी तत्वावर नेमणूक केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान पात्र उमेदवाराची आरोग्‍य केंद्र स्‍तरावर ताबडतोब नेमणूक करण्‍यात येईल. सद्यस्थितीत गोवर आजाराचे रुग्ण अधिक आढळत असल्‍याने लसीकरण गतिमान करण्‍यासाठी सर्व परिचारिकांना लसटोचक म्‍हणून या मोहिमेत सहभाग घ्‍यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवृत्‍त सार्वजनिक आरोग्‍य परिचारिका, सहायक आरोग्‍य प्रसविका यांनादेखील लसटोचक म्‍हणून या मोहिमेत सहभाग घेता येईल, असे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages