मुंबई - झोपडपट्ट्यातील गोरगरीबांना घराजवळच पालिकेची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी मुंबई महापालिकेने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांत गेल्या ५० दिवसांत तब्बल एक लाख जणांना मोफत उपचार मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेने पहिल्या टप्प्यात झोपडयांजवळपास ५२ आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मुंबईभरात आणखी १०० ‘आरोग्य केंद्रे’ सुरू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
मुंबईकरांना घराजवळ आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आरोग्य केंद्र उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबईभरात झोपडपट्यांतील रहिवाशांच्या घराजवळ २०० ‘आरोग्य केंद्रे’ सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट्य आहे. यानुसार अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ५२ केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. पोर्टा केबीनमध्ये दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्ससह परिचारिका, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेची नियमित आरोग्य केंद्रे दुपारी ४ वाजता बंद झाल्यानंतरही नवी आरोग्य केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहत ठेवली जात आहेत. त्यामुळे यावेळेतही आरोग्य केंद्रात उपचार घेता येणे शक्य झाले आहे. दरम्यान, या उपक्रमासाठी पालिकेला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीन मालक, तयार बांधकाम मालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही पालिकेने केले आहे. यामध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात येणार्या ६०० ते १००० स्वेअर फूट जागांच्या भाड्याचा योग्य मोबदलाही संबंधितांना दिला जाणार आहे.
प्रमुख रुग्णालयांवरील ताण होणार कमी -
पालिकेच्या प्राथमिक आरोग्य सेवेंतर्गत २११ आरोग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि तृतीय स्तरीय आरोग्य सेवेंतर्गत ४ वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये, १ दंत महाविद्यालय आहे. पालिकेच्या प्रमुख मोठ्या रुग्णालयात दर्जेदार, अद्ययावत आणि मोफत उपचार मिळत असल्यामुळे येथे देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांवर ताण येतो. मात्र पोर्टा केबीन दवाखान्यांमुळे गरजूंना घराजवळच उपचार मिळत आहेत. त्यामुळे पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे. रुग्णांना घराजवळ आरोग्य केंद्रे असल्याने वेळेत उपचार घेता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम फायद्याचा ठरत असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment