गांधीनगर / गुजरात - विधानसभेचा निकाल भाजपसाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल 157 जागांवर विजय मिळवला आहे. मतांच्या टक्केवारीचेही जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल 53 टक्के मतं मिळवली आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तसेच काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 16 जागा तर आम आदमी पक्षाला आतापर्यंत केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला.
भाजपने यंदाच्या निवडणुकीत या आधीचे सर्व जुने विक्रम मोडले आणि तब्बल 53 टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. 2002 सालच्या निवडणुकीत 49.85 टक्के, 2007 साली 49.12 टक्के आणि 2012 साली 47.85 टक्के मतदान भाजपने मिळवले होते. यंदा त्यापेक्षा अधिक मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपली मतं टाकली.
सन 2001 साली मोठ्या राजकीय घडामोडींनंतर भाजपने नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर 2002 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने 127 जागांवर विजय मिळवला होता. त्या आधी 1998 साली भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या हा जुना विक्रम मोडला असून 157 जागा मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे.
सन 2002 सालच्या निवडणुकीनंतर भाजपने गुजरात मॉडेलच्या आधारे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्या, पण भाजपच्या जागांमध्ये सातत्याने घट होताना दिसली. सन 2007 साली भाजपला 117 जागा मिळाल्या, त्यानंतर 2012 साली 115, जागा मिळाल्या.
No comments:
Post a Comment