सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे - उपमुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे - उपमुख्यमंत्री

Share This

नागपूर - सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्वं सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष कार्यक्रम राज्य शासन हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीमावर्ती भागातील घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर फडणवीस यांनी निवेदन केले. सदस्य शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, जयंत पाटील यांनी याविषयावर भूमिका मांडली.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होते. भारतीय राज्यघटनेने सर्वांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कर्नाटक सरकारने या आंदोलकांना बळजबरीने अटक केली. या अटक केलेल्या लोकांना तत्काळ सोडविण्यासाठी हे सरकार कार्यवाही करेल”.

सीमावासीयांच्या प्रश्नांसंदर्भात दोन्ही राज्यांत सलोखा राहिला पाहिजे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केला तसेच अन्याय थांबला पाहिजे यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या ट्विटर हँडलवर काही प्रक्षोभक ट्विट झाले. मात्र हे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केले नसल्याने याप्रकरणी एफ.आय.आर. दाखल करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना, दिलेला निधी आणि प्रस्तावित केलेल्या योजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages