पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यासाठी गुंदवली मेट्रो स्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीं आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी गुंदवली ते मोगरा मेट्रो स्थानक असा मेट्रो प्रवास केला.
बीकेसी येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची मेट्रो, छत्रपती शिवाजी टर्मिनसचे आधुनिकीकरण, रस्ते सुधारणेचा मोठा प्रकल्प, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रुग्णालये, हे मुंबई शहर सुधारण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. विकासाचा पैसा योग्य ठिकाणी लागला पाहीजे. आम्ही राजकीय स्वार्थासाठी विकासाला कधीही ब्रेक दिला नाही पण यापूर्वी हे पाहायला मिळालं, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली. ते पुढे म्हणाले, माझे फेरीवाला भाऊ बहीण सावकारांकडे जात होते. सावकारांच्या जाचातून वाचवण्यासाठी स्वनिधी योजना आहे, असं ते म्हणाले. जेवढा डिजीटल व्यवहार कराल तेवढं तुम्हाला व्याज लागणार नाही. तुमचे पैसे वाचतील, तुमच्या मुलांच्या भविष्याचं काम होईल. तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वराज्य आणि सुराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तोच विचार आम्हीही पुढे घेऊन चाललो आहोत. मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, असे म्हणत एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींनी मेट्रोचं भूमिपूजन केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काही चालत नाही, मोदींच्या व्यक्तीमत्त्वामुळे असं काही आहे की, जे आपल्याला उर्जा देतं. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही पंतप्रधान मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं असे मुख्यमत्री शिंदे म्हणाले. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचे मला जाणवलं असंही ते म्हणाले. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही जणांनी गद्दारी केल्याने सत्ता गेली होती, पण राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सत्ता आली आहे. २० वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली. २० वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्यानी केवळ स्वतःची घरं भरली''... पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात विकास साधला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास आठवले, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन, खा. राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment