मुंबई - भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. याचे तीव्र पडसाद उमटले आहे. महात्मा फूलेंचा अवमान केला असल्याने चित्रा वाघ यांचा भीम आर्मीने निषेध केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमाणेच चित्रा वाघ यांचेही तोंड शाहीने काळे करू असा इशारा भीम आर्मीचे (Bheem Aemy) अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी दिला आहे.
राज्यात सध्या आक्षेपार्ह विधानाचे वातावरण सुरू आहे. भाजप नेत्यांकडून सतत महापुरुषांचा अपमान केला जात आहे. अशातच पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुण्यातील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतीबांचा शोध आहे, असे विधान त्यांनी केले. कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, काही मिनिटांपूर्वीच दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदाच एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणत असते पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. तसेच, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या ज्योतीबांचा शोध मात्र जारी आहे. असेच ज्योतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण व्हावे, अशा शुभेच्छा देते, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
यावर, चित्रा वाघ यांचे डोकं फिरलेय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा ज्योतिबा फुलेंची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अपमान केलेला आहे. यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचा आणि देशाचाही अपमान केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुमच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भीम आर्मीच्या महिला ब्रिगेड तुमचा शाईने सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लवकरच करतील, असा इशाराच भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment