मुंबई महापालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे. निवडणूक लांबल्याने पालिका सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे पालिकेत नगरसेवकही नाहीत. असे असताना अनेक नगरसेवक हे पालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरहेडचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. लेटरहेड वापरून पोलिसात तक्रार करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे. जून महिन्यात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने लेटरहेडचा वापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी वरळी पोलिस ठाण्यात ५ जून रोजी रीतसर लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र अदयाप त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पोलीस आणि पालिका यंत्रणा याप्रकरणी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे उत्तर त्यांना दिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेप्रमाणेच मुंबईत अनेक ठिकाणी माजी नगरसेवक लेटरहेडचा गैरवापर करीत असल्याचे आढळून आले आहे. पश्चिम उपनगरातील एका महिला नगरसेविकेनेही असाच लेटरहेडचा वापर केला आहे. संबंधित नगरसेवकाचा अजून साधा जबाबही नोंदविलेला नाही. त्यामुळे नियमभंग झालेला असल्याचे ढळढळीत दिसत असूनही त्यावर कारवाई करण्यास कोणतीही यंत्रणा तयार नसल्याचे मत भंडारे यांनी व्यक्त केले आहे. नियमानुसार कारवाई होत नसल्यामुळे माजी नगरसेवक बिनधास्त लेटरहेडचा वापर करीत असल्याचे भंडारे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment