बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेन्ट्रल स्कुलच्या 42 व्या वार्षिक संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, जी एस टी आयुक्त रवींद्र बांगर, प्रिन्सिपल बी बी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वार्षिक संमेलनात उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आठवले यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांमध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिकत आहेत. बेलापूर सेन्ट्रल इंग्लिश स्कुलमध्ये दलित आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करून या शाळेत दलित आदिवासी आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांची संख्या वाढवा अशी सूचना आठवले यांनी केली. सध्या शाळेची पटसंख्या चांगली असल्याबद्दल प्रिन्सिपल बी बी पवार यांचे आठवले यांनी कौतुक केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे काम कोणतेही मतभेद न बाळगता एकजुटीने करावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारकडून बेलापूर सेन्ट्रल विद्यालयाच्या पुनर्विकासासाठी 4 कोटी 50 लाख आणि नवीन विद्यालय इमारतीसाठी 14 कोटी मंजूर झाले असून त्याचे काम लवकर सुरू होईल. बेलापूरमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सिडकोकडून 5 एकर जमीन मिळवून भव्य शिक्षण संकुल उभारून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज, बिझिनेस मॅनेजमेंट सारख्या विद्याशाखांचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment