पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हतेच्या निषेधार्थ आज निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2023

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हतेच्या निषेधार्थ आज निदर्शने


मुंबई - राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या व गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना उदया गुरुवारी दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करणार आहेत. यानंतर नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. (journalist protest)

कोकणातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलेल्या पंढरीनाथ आंबेरकरला छातीत दुखत असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, आता पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कलम ४ अन्वये नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कायद्यातील तरतुदीप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात वरच्या मजल्यावरती दोन नंबर स्पेशल खोलीत त्याला ठेवण्यात आलं आहे. बाहेर असलेल्या पोलिसांकडून कोणती माहिती दिली जात नाही. पंढरीनाथ आंबेरकर याला व्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जाते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे याची हत्या करणारा संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी २०१९ रिफायनरी समर्थनार्थ लोकसभेची निवडणूक ही लढवली होती. तर अलीकडे काही महिन्यांपूर्वी रिफायनरी समर्थक असलेला पंढरीनाथ आंबेरकर याने एका राजकीय पक्षात प्रवेश केल्याचेही बोलले जात आहे. शशिकांत वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधात आपली भूमिका मांडत होते दैनिक महानगरी टाइम्स या वृत्तपत्रात त्यानी सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती.

या बातमीत संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी बॅनर लावलेला फोटोची बातमी त्यांनी केली होती. ही बातमी त्याने व्हाट्सअॅपवर सोमवारी सकाळी व्हायरल केली होती आणि याच दिवशी दुपारी या बातमीत उल्लेख असलेल्या संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी त्यांची हत्या केल्याचे समोर आले. यामुळे उपलब्ध झालेल्या प्रथम दर्शनी पुराव्यावरून व त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पंढरीनाथ आंबेरकर यांच्या वरती बुधवारी दुपारच्या सुमारास भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या सगळ्या भयंकर प्रकरणानंतर रिफायनरी विरोधी संघटनेने शशिकांत वारीशे हत्या करणारा पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या हत्येवरून आता रिफायनरी विरोधात कोणीही लिखाण करायचेच नाही का कोणी भूमिका मांडायचीच नाही का? जो रिफायनरी विरोधात भूमिका घेईल त्याची हीच गत केली जाईल असाच ईशारा दयायचा नाही ना. संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची हत्या करण्यामागे हाच इशारा देण्याचा हेतू होता की काय असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया रिफायनरी विरोधी संघटनेने दिली आहे. या दुर्दैवी हत्येनंतर आता रिफायनरी विरोधातला लढा अजून तीव्र केला जाईल असा इशारा रिफायनरी विरोधी संघटनेकडून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad