Dilapidated Buildings - मुंबईतील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2023

Dilapidated Buildings - मुंबईतील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण २२६ इमारतींची यादी महानगरपालिकेने जाहीर केली आहे. ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या २२६ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगरे विभागात ६५ तर पश्चिम उपनगरे विभागात १२६ इमारती यादीत समाविष्ट आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱया नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. (Dilapidated Buildings in Mumbai)

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२६ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये 'अतिधोकादायक व मोडकळीस' घोषित करण्यात आले आहे. या इमारतींची विभागनिहाय यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर ----> In Focus ----> Find out more---- > Quick Links ----> List of C-1 category Dilapidated Buildings 2023-24 या क्रमाने जावून पाहता येईल.  या शीर्षकात नागरिक आपली इमारत अतिधोकादायक घोषित केलेल्या यादीमध्ये आहे किंवा नाही, याची खात्री करु शकतात.

या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, 'अतिधोकादायक व मोडकळीस'  घोषित केल्यानंतर आणि निवासस्थाने रिक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर देखील काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील आणि त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

प्राथमिक लक्षणे -  
१) इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.
२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.
३) इमारतीच्या कॉलम मधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.
४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.
५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.
६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.
७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.
८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.
९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.
१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.

रहिवाश्यांनी काय काळजी घ्यावी –
१) बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २४ x ७ कार्यरत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६/ २२६९-४७२५/२२६९-४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
२) सदर इमारत तातडीने रिकामी करावी.
३) आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांना सुद्धा सतर्क राहण्यास अवगत करावे.
४) तातडीने तज्ज्ञ आर.सी.सी. तांत्रिक सल्लागार यांना दाखवून प्रॉप्स / टेकू लावण्यासंदर्भात त्वरेने कार्यवाही करावी. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad