मुंबई - मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगी प्रांजल व मुलगा प्रसाद हे आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव सांताक्रूझ(पूर्व) येथील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता वांद्रा पूर्व, टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
माजी महापौर महाडेश्वर हे गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. रायगड येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही हजेरी लावली होती. दोन दिवसांच्या दगदगीनंतर मुंबई परतल्यावर सोमवारी त्यांच्या छातीत दुखू लागले. पालिकेच्या केईएम रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यानंतर ते घरी गेले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच चटका लावून गेला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुसबे या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनि. कॉलेज, कसाल येथे त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. रुईया महाविद्यालयातून पदवी संपादन केली. ते स्वत: खेळाडू असल्याने क्रीडा शिक्षक व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. भारतीय क्रीडा मंडळ, वडाळा येथून बी.एड. चा (शारीरिक शिक्षण) अभ्यासक्रम पूर्ण करून सन १९८६ मध्ये घाटकोपर येथील मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्रजी आणि शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. शिवसेनाप्रमुखांची भाषणे, धारदार वाणीने प्रभावित होऊन ते शिवसैनिक झाले.
शिवसेनेचे खंदे समर्थक, अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. २००२ साली मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ साली मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्ष झाले. २००७, २०१७ मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. २०१७ मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. शिक्षण क्षेत्रात त्यांचे काम मोठे होते. राजे शिवाजी विद्यालय या शिक्षण संस्थेचे ते संस्थापक संचालक होते.
No comments:
Post a Comment