Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Mumbai Zoo - राणीबागेत ‘क्रॉक ट्रेल’ खुले, मगर आणि सुसर पाहण्याची संधी


मुंबई - शाळांना सुट्या असल्याने सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. उन्हाळी सुट्या असल्याने संग्रहालयात बच्चे कंपनीही आपल्या पालकांसह मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ (मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येण्याऱ्या पर्यटकांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (Ranibagh, mumbai zoo)

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उदयान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आता जलचर आणि उभयचर प्राण्यांचेही दर्शन पर्यटकांना होत आहे. उन्हाळ्यात मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यातून तसेच परदेशातील पर्यटकही भेट देतात. 

सध्या उद्यानात वाघ, बिबट्या पेंग्विन, अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यातच रविवार, दिनांक ७ मे २०२३ पासून उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत.  प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळयाकाठी बनविलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचालीदेखील पर्यटक टीपू शकतात. 

पाणपक्ष्यांचा पिंजरा ठरतोय आकर्षण- 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आणखी एक खास आकर्षण म्हणजे पाणपक्ष्यांसाठीचा पिंजरा. या पिंजऱ्यात पर्यटकांना स्वत: आत जाता येते. पिंजऱ्यात गेल्यावर आपल्या चोहीबाजूला पक्षी नजरेस पडतात. त्यामुळे आपण पक्ष्यांच्याच घरट्यात शिरल्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत.

अंडर वॉटर व डेक व्ह्युविंग गॅलरी - 
प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरीसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेत आहेत. सध्या या ठिकाणी असणाऱ्या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मांसाहारी खाद्य देण्यात येत आहे.

पर्यटकांचा राबता - 
शनिवार, रविवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. आठवड्याच्या अखेरीस शनिवारी आणि रविवारी तब्बल ३३ ते ३५ हजार पर्यटक उद्यानात येतात. तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज २० ते २२ हजार पर्यटक हमखास येतात.

गांडूळ खतही उपलब्ध - 
उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाकडून मुख्य तिकीट खिडकीवर गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे खत उद्यानातच तयार केले आहे. त्यामुळे पर्यटकांना परस बाग, टेरेस गार्डनमधील रोपांसाठी हे खत उपयोगी पडू शकते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom