जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2023

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार


मुंबई - एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण होतंय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर मंत्रीमंडळाला मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. कुणाला मंत्री करायच हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळतेय. मात्र यामुळे राज्यातील दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदं धोक्यात येण्याची शक्यता आहे. कालच्या दिल्ली बैठकीत केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल. भाजपच्या महाराष्ट्रातल्या मिशन फोर्टी फाईव्हला लाभदायक ठरू शकतील अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पंढरपूरमधील पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली -
शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा बराच रखडला आहे. या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटाच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवतेय. अपक्ष आमदारांसह अनेक आमदारांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये होते. पंढरपूरमधील शासकीय पूजा सपत्निक पार पाडून आणि सर्व विधी संपवून मुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संभावित शिंदे गटाकडून कोण मंत्री होऊ शकतात? कोणत्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल? अशा स्वरुपातील चर्चा या बैठकीत झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad