Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मोगरा नाल्यात नाला फ्रीज, कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप


मुंबई - अंधेरी भूयारी मार्गाजवळून वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वाहून आलेला १६५ लीटरचा फ्रीज तसेच कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि यासारख्या इतर साहित्यांनी काल (दिनांक २४ जून २०२३) सायंकाळी अंधेरी भूयारी मार्गाची पावसाळी पाणी उदंचन करणारी यंत्रणा विस्कळीत करून टाकली. असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अवघ्या तासभरात सर्व यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला. 

अंधेरी भूयारी मार्गाच्या स्थितीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज (दिनांक २५ जून २०२३) पाहणी करून आढावा घेतला. पावसाचे पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या पाहणी प्रसंगी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंधेरी भूयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. अंधेरी भूयारी मार्ग ठिकाणाचा भौगोलिक आकार हा बशीसारखा आहे. या भूयारी मार्गाला लागूनच मोगरा नाला वाहत जातो. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो. विशेष म्हणजे नाल्याचा हा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गाकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे. म्हणजेच नाल्याचा प्रवाह हा अत्यंत जोरात येतो. त्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्यास या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणे हे अत्यंत मोठे आव्हान ठरते. 

या आव्हानावर मात करण्याकरिता, अंधेरी भूयारी मार्ग परिसरासाठी एकूण तीन ठिकाणी मिळून पाणी उपसा करणारे सहा पंप आणि पूर प्रतिबंधक दरवाजे (फ्लड गेट) यंत्रणा उभारण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील मिलेनियम इमारत, विरा देसाई मार्ग, अंधेरी भूयारी मार्ग या तीन ठिकाणी ही यंत्रणा उभारली आहे. ताशी ३ हजार मीटर क्युबिकचे हे सहा पंप तीन ठिकाणी लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले. अतिरिक्त उपाययोजना म्हणून १ हजार मीटर क्युबिकचे २ पंप लावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही यंत्रणा भर पावसात सुरळीत सुरू रहावी, त्यात कचरा अडकून पंप बंद पडू नयेत, यासाठी नाल्यात पूर्व बाजूला पोलादी जाळी देखील लावली आहे. जेणेकरून तरंगता कचरा रोखून प्रवाह पुढे जाऊ शकेल.

पावसाळापूर्वक कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर देखील नाल्यांमध्ये नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा तरंगताना आढळत असल्याने तो देखील महानगरपालिकेच्या यंत्रणेने वारंवार काढून नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. असे असताना, काल (दिनांक २४ जून २०२३) सायंकाळी जोरदार पाऊस होत असताना मोगरा नाल्यातील प्रवाह सोबत अतिशय मोठ्या प्रमाणावर तरंगता कचरा अंधेरी भूयारी मार्गाच्या दिशेने आला. त्यामध्ये १६५ लीटर क्षमतेचा फ्रीज, कपाट, पलंग, इतर अवजड साहित्य तसेच ताडपत्री, रबरी पाईप, नायलॉन चटई इत्यादी अनेक वस्तू होत्या.

हे सर्व अवजड साहित्य अंधेरी भूयारी मार्ग लगत नाल्यामध्ये कचरा रोखण्यासाठी लावलेल्या जाळीत अडकले. त्यापाठोपाठ येणारा इतर सर्व कचरा देखील जाळीत अडकला. परिणामी नाल्याचा प्रवाह पुढे न जाता ओसंडून रस्त्यावर आला आणि भूयारी मार्ग तुंबला. सदर अवजड साहित्य, तरंगता कचरा आणि त्यावरून पाण्याचा प्रचंड दबाव यामुळे सदर पोलादी जाळी तुटली. दरम्यान, हे सर्व घडत असताना, दुसऱ्या बाजूला पाणी उपसल्यानंतर त्याचा प्रवाह आपल्या भागात सोडण्यात येत असल्याची हरकत घेवून काही स्थानिक नागरिकांनी उदंचन व्यवस्था देखील बंद पाडली. या सगळ्यांचा परिपाक म्हणून सदर परिसरात पाणी साचले.

या बिकट परिस्थितीत देखील गोंधळून न जाता पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जलद हालचाली करून संयमाने परिस्थिती हाताळली. नाल्यातील जाळी ताबडतोब काढून, तसेच शक्य तेवढा तरंगता कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. तसेच संबंधित स्थानिक नागरिकांचा गैरसमज दूर करून उदंचन यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामुळे अवघ्या तासभराच्या आत अंधेरी भूयारी मार्गातील पाण्याचा निचरा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज सदर ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा, झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांची देखील संवाद साधून त्यांनी सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि गैरसमज दूर केले. त्याचप्रमाणे, पोलादी जाळीची पुनर्रचना करून ती लवकरात लवकर लावावी, भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

दरम्यान, अंधेरी भूयारी मार्गातील पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी सध्या केलेली पंपिंग व्यवस्था ही तात्पुरती व्यवस्था आहे. आयआयटी मुंबईने सुचविलेल्या दीर्घकालीन उपायांचा महानगरपालिका प्रशासनाकडून आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार पुढील पावसाळा (२०२४) पूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात येत आहे.

दरम्यान, नाल्यांमध्ये कचरा टाकू नये. नाल्यांमध्ये कचरा टाकल्याने तसेच अवजड साहित्य टाकून दिल्याने त्यातून जोरदार पावसाप्रसंगी यंत्रणा कोलमडून पडते आणि त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. नाल्यात कचरा टाकू नये, नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom