देवनार पशुवधगृहात १ लाख ६८ हजार शेळया - मेंढयांची विक्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2023

देवनार पशुवधगृहात १ लाख ६८ हजार शेळया - मेंढयांची विक्री


मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असा लौकिक असणा-या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या देवनार पशुवधगृहात बकरी ईद निमित्‍त मोठ्या संख्येने जनावरे दाखल झाली होती. त्‍यात १ लाख ७७ हजार २७८ शेळया - मेंढयांचा, तर १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांचा समावेश होता. त्‍यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया - मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.  
.
गेल्या आठवड्यात झालेल्या बकरी ईद सणानिमित्त बृहन्‍मंबई महानगरपालिकेच्‍या देवनार पशुवधगृह परिसरात संबंधित विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. या अनुषंगाने देवनार पशुवधगृहातील सेवा - सुविधा अधिकाधिक प्रभावीपणे देता याव्‍यात यासाठी महानगरपालिका प्रशासकाने सातत्‍याने विविधस्‍तरिय प्रयत्न यशस्वीपणे करत होते. ही विविध स्तरीय कार्यवाही महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) श्रावण हर्डीकर , उपायुक्‍त (अभियांत्रिकी) अशोक मिस्‍त्री यांच्‍या मार्गदर्शनात करण्‍यात आली, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ.‌ कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे‌.

बकरी ईद सणाच्या निमित्ताने देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन व आयोजन करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात झालेल्‍या 'बकरी ईद' (ईद - उल - झुआ) सणाला देवनार पशुवधगृहात दरवर्षीप्रमाणेच देशाच्‍या विविध भागातून विक्रेते दाखल झाले होते. साधारणपणे सणाच्‍या १० ते १५ दिवस आधी हे विक्रेते देवनार पशुवधगृहात दाखल झाले होते. त्यांच्‍यासोबतच १ लाख ७७ हजार २७८ बकरे आणि १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरे दाखल झाली होती. त्‍यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया - मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.

देवनार पशुवधगृहाच्‍या ६४ एकराच्‍या प्रशस्‍त जागेत 'बकरी ईद' निमित्‍त बकरे व म्‍हैसवर्गीय जनावरांच्‍या स्‍थायी स्‍वरूपातील निवास क्षमतेसह ७७ हजार चौरस मीटर जागेवर अतिरिक्‍त निवारा केंद्र (शेल्‍टर्स), मंडप उभारण्‍यात आले होते. जनावरांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैदयकीय आरोग्‍य केंद्र यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. पशुवधगृहातील 'म्हैस धक्का' येथे जनावरांसाठी नवीन शेड उभारण्यात आले होते. शिवाय पूर्वीच्या शेडची देखील दुरूस्ती करण्यात आली होती. 'म्हैस धक्का' येथे महाराष्ट्र शासनाच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या अखत्यारीतील पशुवैद्यकीय अधिका-यांनी विक्रीकरिता आणलेल्या जनावरांची वैद्यकिय तपासणी करण्‍यात आली. वैद्यकीय तपासणी नंतरच ही जनावरे विकण्याची अनुमती देण्यात येत होती. ही बाब नोंद घ्यावी, अशी असल्याचे डॉ. पठाण यांनी सांगितले.

मोठया संख्‍येने खरेदीदार येत असल्‍याने या ठिकाणी एका भागात 'फूड झोन' उभारण्यात आले होते. त्यामुळे अभ्यागतांची सोय झाली होती. तसेच अभ्यागतांसाठी पाणपोई देखील उभारण्यात आल्या होत्‍या. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी टाक्याही बसविण्यात आल्या होत्‍या. तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाड्याजवळ ५ हजार लीटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्‍या.

प्रभावी सुरक्षा व्‍यवस्‍थेसाठी यंदा देवनार पशुवधगृह परिसरात ३०० 'क्‍लोज सर्किट टेलीव्हिजन कॅमेरे' (सीसीटीव्‍ही) कॅमेरे लावण्‍यात आले होते. त्‍याचसोबत पॅन - टिल्‍ट - झूम (पीटीझेड) ची सुविधा असणारे १२ टेहाळणी कॅमेरे, १ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्‍क्रीनही लावण्‍यात आले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हँडमेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी, डोअरमेटल डिटेक्टर इत्यादी अत्याधुनिक उपकरणांसह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामुळे महानगरपालिकेच्‍या सुरक्षा विभागाला आणि मुंबई पोलिस दलास नियंत्रण कक्षातून देवनार पशुवधगृह परिसरावर देखरेख ठेवणे सहज शक्‍य झाले होते. 

साफसफाईची व्‍यवस्‍था रहावी याकरिता पशुवधगृहाच्‍या परिसरात श्रमिक अहोरात्र कार्यरत होते. परिसरातील कचरा व मृत जनावरे उचलून नेण्‍यासाठी अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. त्‍याचबरोबर नागरिकांच्‍या सोयीसाठी शौचालये, मोबाईल टॉयलेटची व्‍यवस्‍थादेखील करण्‍यात आल्‍याचीही माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad