मुंबई - ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वर्षा निवासस्थानी कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये जॉन निकेल, सचिन निकारगे यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि ब्रिटन दोघांमध्ये वाणिज्यिक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंतवणूकदार असून त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ब्रिटनकडे या सर्व क्षेत्रात जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आहे. भारताच्या जीडीपीमध्ये राज्याचे सर्वात मोठे योगदान असून आणि थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वे वर्ष सोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment