कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान

Share This

मुंबई - आपल्या किलकिल्या डोळ्यांनी ‘ते’ नुकतंच हे जग न्याहाळत होतं…आईची कुस शोधत जिवाच्या आकांताने हात-पाय झटकत होतं…‘ट्याहा ट्याहा’ करून आपण जिवंत असल्याची हाक देत होतं…आईचा स्पर्श व्हावा, तिच्या कुशीतील उब मिळावी म्हणून टाहो फोडत होतं…त्याचवेळी एका नागरिकाच्या कानावर ‘त्याचा’ ‘टाहो’ पोहोचला आणि कचराकुंडीत टाकून दिलेल्या ‘त्या’ अर्भकास जीवदान मिळाले.. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाने वेळीच उपचार करून या अर्भकास जीवदान तर दिलेच, त्यासोबतच मायेची उब देवून त्याचा सांभाळ देखील केला जात आहे..

‘देव तारी त्यास कोणी मारी’ असं आपण नेहमी म्हणतो. सुमारे महिनाभर पूर्वी म्हणजे सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी मुंबई महानगरातील पवई परिसरात कचराकुंडीत टाकून दिलेल्या एका अर्भकास जीवदान मिळाले आणि ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. 

साधारण १.४ किलो वजन असलेले नवजात अर्भक पवई परिसरातील एका कचराकुंडीत अज्ञाताने टाकून दिल्याचे आढळून आले. या कचराकुंडी जवळून जात असलेल्या एका सुजाण नागरिकाने या बाळाचा आवाज ऐकताच तत्परतेने पवई पोलिसांना कळवले. त्यानंतर पवई पोलिसांच्या निर्भया पथकाने त्यास घाटकोपर स्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात या अर्भकास दाखल करुन त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांनी हे अर्भक रुग्णालयात आणले तेव्हा ते थंडीने अक्षरश: कुडकुडत होते. थंडीमुळे त्याच्या शरीराचे तापमानही कमी झाले होते. मात्र रुग्णालयातील बालरोग आणि नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या अर्भकाला वेळीच आणि योग्य उपचार देण्यात आले. तसेच या अर्भकाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशी काळजीही घेण्यात आली. आता या बाळाचे वजन चांगल्यारितीने वाढले असून, त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. सध्या या बाळाचे वजन २.२ किलोग्रॅम इतके आहे.

नवजात अर्भक असल्याने स्वाभाविकच त्याला आईचे दूध देणे खूप गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता सध्या त्याला Simyl MCT आणि राजावाडी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँकेमार्फत दूध पुरविले जात आहे. याव्यतिरिक्त या अर्भकास बीसीजी, ओपीव्ही आणि हिपॅटायटीस बी यांसारखे महत्त्वाचे लसीकरणही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राजावाडी रुग्णालयात असलेली ह्युमन मिल्क बँक ही महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील पहिलीच मानवी दुग्ध पेढी आहे. याप्रसंगत, आई नसलेल्या बाळासाठी खऱ्या अर्थाने ती अमृतदायी ठरली आहे.

सुरुवातीला राजावाडी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व त्यानंतर प्रसूति पश्चात उपचार विभागात डॉ. अमीत व्हटकर, डॉ. राधा बालाजी, परिसेविका सुरेखा महाकाळ, परिचारीका पूजा नवलकर, अमीता खंडागळे व इतर कर्मचाऱ्यांकडून या अर्भकाची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर, पवई पोलीस निर्भया पथकातील महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना पवार या सातत्याने रुग्णालयात तैनात राहून या बाळाची काळजी घेत आहेत.

राजावाडी रुग्णालय प्रशासनाने संबंधित पोलिस स्थानकास सदर बाळ सापडल्याच्या घटनेबाबत माहिती पुरविली असून त्याआधारे पोलिस प्रशासन पुढील तपास करीत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) डॉ. भारती हेमंत राजूलवाला यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages