मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले असून अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राला आता शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा धक्का देताना रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडला आहे.
पहिल्यांदा
अजित पवार यांनी ११ नोव्हेंबर २०१० रोजी सर्व प्रमथ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तब्बल १ वर्ष ३१९ दिवस या पदावर राहिल्यानंतर २५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.
दुस-यांदा -
यानंतर तीनच महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात ७ डिसेंबर २०१२ रोजी अजित पवार यांनी पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कायम राहिले. एकाच पंचवार्षिकमध्ये दोन वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
तिस-यांदा -
अजित पवार यांनी तिस-यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ती २३ नोव्हेंबर २०१९ रोजी. त्यांचा हा शपथविधी संपूर्ण देशभरात चांगलाच चर्चेत राहिला. सकाळीच घेतलेल्या या शपथेला पहाटेचा शपथविधी म्हणून संबोधले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवल्याने अजित पवार यांचे हे बंड तीनच दिवसांत फोल ठरले.
चौथ्यांदा -
देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर अजित पवारही पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ३० डिसेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत २ वर्षे १८१ दिवसांसाठी ते या पदावर कायम राहिले.
पाचव्यांदा -
आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी आज म्हणजेच २ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पाचव्यांदा या पदावर विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिकमधील हे त्यांचे तिसरे उपमुख्यमंत्रीपद आहे.
No comments:
Post a Comment