मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री खाते वाटपाचा निर्णय घेतील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2023

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री खाते वाटपाचा निर्णय घेतील


मुंबई - मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा अधिकार मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा निर्णय एकत्रितपणे घेतील व येत्या काही तासांमध्ये हे खाते वाटप जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना पक्षाचे उपनेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. घर फोडल्याचा आरोप फेटाळत ते म्हणाले की आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही, मात्र गेल्या पाच वर्षांत शिवसेनेत किती कुटुंबांनी प्रवेश केला ते तपासावे लागेल, असे प्रत्युत्तर सामंत यांनी दिले.

राजकीय पक्षांतील कार्यकर्ते पक्ष बदलत असतात त्यामुळे घर फोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मधून ज्यावेळी प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे पुतणे विद्यमान संदीप क्षीरसागर यांच्यात सुद्धा घरात फूट पडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, त्यामुळे त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही. मुख्यमंत्री याबाबत जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातील १४ रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्याचे राजकारण व भौगोलिक स्थिती माहित आहे, त्यामुळे कामाच्या क्षमतेवर वाटप होईल व मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. अर्थ खाते अजित पवारांना देण्याबाबतच्या वृत्ताबाबत ते म्हणाले की, कोणत्याही जीआर मधून खाते वाटप होत नाही. येत्या काही तासात खातेवाटप होईल मात्र त्याचा नेमका कालावधी सांगण्यास त्यांनी नकार दिला.

अजित पवार यांनी महविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्याचा नेमका विकास कोण करत आहे हे राज्यातील जनतेला अजित दादांमुळे लक्षात आल्याचे सामंत म्हणाले. शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे, नोटीस आल्यानंतर आम्ही आमची बाजू विधानसभा अध्यक्षांकडे मांडणार आहोत. आमच्याकडे असलेले खरे कागदपत्र, नंबर आणि कायदेशीर रित्या आम्ही कशा पद्धतीने या गोष्टी केल्या आहेत ते उदाहरण व पुरव्यासकट आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे मांडू व विधानसभा अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्हाबाबत निर्णय दिल्यानंतर त्यावर बोलणे चुकीचे आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व बाबी जाहीर न करता काही बाबींवर निकालातून प्रकाश टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या माध्यमातून विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोचवणे, हा राज्यकर्त्यांचा स्थायी भाव असला पाहिजे व त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत, असे सामंत म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad