१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवा - मुंबई महापालिकेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2023

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवा - मुंबई महापालिकेचे आवाहन


मुंबई - स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त 'माझी माती-माझा देश' अभियान राबवले जात आहे. याचा एक भाग म्हणून रविवार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावा याकरीता मुंबईत डाक विभागाची २२४ कार्यालये, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या पाच रेल्वे स्थानकांवर देखील राष्ट्रध्वज खरेदी करता येवू शकतील. सर्व मुंबईकरांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकर नागरिकांना केले आहे.  

देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka amrit mahotsav) गत वर्षभरापासून साजरा करण्यात येत आहे. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्ताने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' (meri mati mera desh) या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत 'हर घर तिरंगा' म्हणजेच 'घरोघरी तिरंगा' उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, 'हर घर तिरंगा' उपक्रमात प्रत्येक घर, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवणे अपेक्षित आहे. १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवशी नागरिकांना आपल्या घरी/इमारतीवर दिवसा व रात्री (अखेरच्या दिवशी सूर्यास्तापर्यंत) राष्ट्रध्वज फडकवता येईल. मात्र, सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये व संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.

या ठिकाणी मिळणार राष्ट्रध्वज -
'घरोघरी तिरंगा' अभियानात मुंबईकरांनी गत वर्षी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या वर्षी देखील मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. गत वर्षी महानगरपालिकेने स्वतः राष्ट्रध्वज खरेदी करुन सर्व मुंबईकरांना घरोघरी पोहोच केले होते. तसेच हे ध्वज जपून ठेवण्याचे आवाहनदेखील केले होते. ज्या नागरिकांकडे राष्ट्रध्वज तिरंगा आहेत, त्यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा. ज्यांच्याकडे राष्ट्रध्वज नाही, त्यांना ध्वज खरेदी करण्याची सुविधा विविध माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत सुमारे २२४ डाक कार्यालयांमध्ये (पोस्ट ऑफिस) शासनाने निश्चित करून दिलेल्या दराने राष्ट्रध्वज उपलब्ध आहेत. म्हणजेच सर्व नागरिकांना आपल्या घरानजिक टपाल कार्यालयात जावून ध्वज खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे मुंबईतील पाच मुख्य रेल्वे स्थानकांवरही तिरंगा ध्वज विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. https://mumbaicity.gov.in या संकेतस्थळावर देखील मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्यावतीने तिरंगा ध्वज पुरवठादारांची नावे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. समवेत, मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादीत, श्रीमती लतिका फ्लॅग कंपनी (नायगाव, मुंबई) यांचेकडे देखील राष्ट्रध्वज उपलब्ध असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.

सन्मानाने फडकवा राष्ट्रध्वज-
यंदा देखील दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे. राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा. मागील वर्षी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना राष्ट्रीय ध्वज वितरित करण्यात आले होते. हे ध्वज सुस्थितीत उपलब्ध असल्यास नागरिकांनी यंदाही तोच ध्वज आपल्या घरी फडकवावा किंवा ध्वज खरेदीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या केंद्रावरुन शासनाने ठरवून दिलेल्या दराने खरेदी करुन ध्वज फडकवावा, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad