आदिवासी बोहाडा नृत्याने वर्षा पर्यटन महोत्सवाची शानदार सांगता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2023

आदिवासी बोहाडा नृत्याने वर्षा पर्यटन महोत्सवाची शानदार सांगता


मुंबई (जेपीएन न्यूज) - भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवाची (varsha paryatan mahotsav) बुधवारी आदिवासी बोहाडा नृत्याने (adivasi bohada dance) शानदार सांगता झाली. या पाच दिवसांमध्ये पर्यटकांनी निसर्गरम्य परिसराच्या भेटी सोबतच आदिवासी पारंपारिक लोककलांचा आस्वाद घेतला. त्यामुळे हा पर्यटन महोत्सव यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि घाटघर या अतिशय निसर्गरम्य परिसरात गेल्या पाच दिवसांपासून राज्य पर्यटन विभागाच्या वतीने वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये स्थानिक कलावंतांच्या आदिवासी नृत्य बरोबरच बांबू पेंटिंग आणि आदिवासी वारली पेंटिंग या विषयांवरील कार्यशाळांना पर्यटकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच या पर्यटन महोत्सवाला परराज्यातील व्यावसायिक आणि प्रभावक यांनी लावलेली हजेरी ही अतिशय जमेची बाजू होती. यावेळी या व्यावसायिकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यासोबतच आदिवासी लोककला पाहून मंत्रमुग्ध झालेल्या या  व्यवसायिकांनी या परिसरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली, असे पर्यटन सहसंचालक सुशील पवार यांनी सांगितले.

पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पर्यटकांनी कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराच्या ट्रेकचाही आनंद घेतला. अतिशय धुंद अशा पावसाळी वातावरणात या ठिकाणी करण्यात आलेला ट्रेक पर्यटकांचा आणि पर्यटन महोत्सवासाठी सहभागी झालेल्या अन्य उपस्थितांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.  पर्यटन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी घाटघर कोकणकडा येथे बोहाडा हे अतिशय लोकप्रिय असे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले तसेच महिला फुगडी सादर करण्यात आली. या नृत्य प्रकारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पर्यटकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आर्नी सायकलिंग ग्रुप यवतमाळ तर्फे देशभक्तीपर गीतांवर आधारित डान्सला तसेच झुंबा डान्सला पर्यटकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. भंडारदरा शेंडी आणि घाटघर या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून अनेक उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून या पर्यटन महोत्सवात राबविण्यात आले स्थानिक आदिवासी बांधव तसेच पर्यटकांनी मोठ्या उत्साहाने या पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन या महोत्सवाची शोभा वाढवली या उत्साहाच्या वातावरणातच भंडारदरा वर्षा महोत्सवाची बुधवारी पर्यटन संचालनालयाचे सह संचालक पवार यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad