मुंबई (जेपीएन न्यूज) - राज्य सरकारने दुकानाच्या बाहेर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात व्यापारी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मुंबईत दुकानाच्या बाहेर मराठी पाट्या न लावणाऱ्या ५,२१७ दुकानदारांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे अशी माहिती उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी सांगितले. (BMC notice to more than 5000 shops that do not put up Marathi boards)
मराठी पाट्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा प्रकारे लावण्यात याव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मुंबईत २८ हजार ६५३ दुकाने असून पालिकेच्या इशाऱ्यानंतर २३ हजार ४३६ दुकानदारांनी मराठी पाट्या झळकावल्या. तर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ५,२१७ दुकानदारांना पालिकेने नोटीस बजावली आहे. १० ऑक्टोबर २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान पालिकेने दुकानांची तपासणी केली होती. त्यामधून ५,२१७ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याचे समोर आले आहे. दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना दोन महिन्यांचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने वेट अँड वाॅचची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे, असे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी मानले आभार ! -
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती महाराष्ट्र सैनिकांमुळे आली. त्यासाठी मनापासून अभिनंदन, असे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment