मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर !


मुंबई - 'जनसामान्यांचे मुख्यमंत्री' अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे (WhatsApp) ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ (CMO Maharashtra) या व्हॉटसॲप चॅनलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. (Chief Minister Eknath Shinde's office now on WhatsApp channel)

जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर काल, मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनल सुरु करण्यात आले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी त्याला फॉलो केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. ही अंमलबजावणी करताना शासनाच्या योजना तसेच निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लोकाभिमुख योजना, विकासप्रकल्पांची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी सदैव जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर  दिला आहे, आता हातातील स्मार्टफोनवर थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची, शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, थ्रेडस, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो. व्हॉटस ॲपने गेल्या आठवड्यात चॅनलची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीकडे संपर्क केला आणि ‘CMO Maharashtra’ या नावाने स्वतंत्र, प्रमाणित चॅनलचा काल ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. या चॅनलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनलचे अनुसरण केले आहे.

चॅनलला असे करा फॉलो -
व्हॉटस ॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनल सेक्शन असून तिथे ‘Find channels’ मध्ये CMO Maharashtra हे टाईप केल्यावर चॅनलच्या यादीमध्ये हे प्रमाणित चॅनल दिसेल, त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनलला फॉलो करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad