एसटी बस अस्वच्छ असल्यास आगार व्यवस्थापकाला दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2023

एसटी बस अस्वच्छ असल्यास आगार व्यवस्थापकाला दंड


मुंबई - राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी अस्वच्छ असल्यास त्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर निश्चित करून प्रतिबस पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पाच महिने उलटल्याने आता बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. एसटीच्या स्वच्छतेसाठी वारंवार लेखी सूचना देऊनदेखील कार्यवाही होत नसल्याने थेट आगार व्यवस्थापकावर गाड्यांच्या अस्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची असणार आहे, असे महामंडळातील अधिका-यांनी सांगितले.

एसटी बस तपासणीसाठी मुख्यालयाकडून साठ वरिष्ठ अधिका-यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाला महिन्यातून १५ बसची तपासणी करून त्यांना गुण द्यावे लागणार आहेत. कमी गुण असलेल्या बसच्या आगार व्यवस्थापकाला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल. या तपासणीची माहिती आगार व्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभागप्रमुखांना देण्याच्या सूचना मुख्यालयाने केल्या आहेत.

एसटी बस सर्वांत अस्वच्छ -
बेस्ट, नवी मुंबई परिवहन, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या गाड्यांच्या तुलनेत एसटीत अधिक अस्वच्छता दिसून येते. वारंवार परिपत्रक पाठवून, बैठका घेऊन, सूचना देऊनदेखील एसटीच्या बसेसच्या स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून गंभीरतेने कार्यवाही केली जात नाही. यामुळे दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बाबींची तपासणी करून गुणांकन - 
– बसची स्वच्छता करणे, बसच्या आतील केरकचरा साफ करणे.
– बसचे दरवाजे आतून व बाहेरून धुऊन व पुसून स्वच्छ करणे.
– बसच्या आतील/बाहेरील सर्व अनधिकृत स्टिकर्स/ पोस्टर्स हटवणे
– बसमधील आसनांची स्वच्छता
– बसमधील सर्व खिडक्या स्वच्छ करणे/पडदे स्वच्छ ठेवणे.
– चालक केबिन व डॅशबोर्ड कपड्याने पुसून स्वच्छ करणे.
– प्रवासी सामान (लगेज) बुथ पाण्याने धुऊन स्वच्छ करणे.
– चालकासमोरील काच आतून-बाहेरून स्वच्छ करणे.
– बसच्या मागील काच आतून-बाहेरून स्वच्छ करणे.
– बसला गंतव्य स्थानाचा सुस्पष्ट फलक असणे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad