जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2023

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज


जालना - जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) आंदोलन (Maratha Aandolan) सुरू होते. शुक्रवारी (१ सप्टेंबर) पोलिस आणि आंदोलकांत रेटारेटी झाली. त्यावरून दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी थेट आंदोलकांवर लाठीचार्ज केला. एवढेच नव्हे, तर आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर वाहने पेटवून दिली. इतरत्रही संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, उपोषण, आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत.

त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण, आंदोलन चिघळू नये, यासाठी पोलिसांकडून उपोषण करणा-या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे आंदोलन चिघळले. त्यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्जही केला. पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लाठीचार्ज केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच विरोधी पक्षांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोलापूर-धुळे महामार्गावर संतप्त आंदोलकांनी लगेचच रस्त्यावरील वाहने जाळली, तसेच वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच छ. संभाजीनगर येथून येणा-या बसही सिडको बसस्थानकातच थांबविल्या. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन छ. संभाजीनगर येथील पोलिसांनाही आता अलर्ट जारी केला आहे.

आंदोलनाला हिंसक वळण, वाहनांची जाळपोळ, दगडफेक -
आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आल्या. तसेच बसेसवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय एक ट्रकही जाळला. त्यामुळे छ. संभाजीनगर सिडको बसस्थानकावर बीडला येणा-या सर्व बसेस थांबविण्यात आल्या. मात्र, यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad