मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी एस आर ए इमारतीला मध्यरात्री (६ ऑक्टोबर) आग लागली. या आगीत एकूण ५१ जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर ३५ रुग्णांवर ट्रॉमा केअर आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
गोरेगाव पश्चिम येथे आझाद मैदान जवळ जय भवानी एस आर ए इमारत आहे. ६ ऑक्टोबरला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर सकाळी ६.४५ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत दुकाने, मीटर कॅबिन, घरातील सामान, दुचाकी, चार चाकी वाहने जळाली आहेत.
या आगीत जखमी झालेल्या ३६ जणांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामधील ६ जणांचा मृत्यू झाला. ४ जणांची प्रकृती गंभीर असून २६ जणांची प्रकृती स्थिर आहे. कूपर रुग्णालयात १५ जणांना दाखल करण्यात आले असून त्यापैकी १ मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असून ९ जणांची प्रकृती स्थिर आहे. ४ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे.
दरम्यान आगीच्या दुर्दैवी घटनेतील रुग्णांची विचारपूस करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे आज (दि. ६ ऑक्टोबर २०२३) सकाळी १०.३० वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि त्यानंतर कूपर रुग्णालय येथे भेट देणार आहेत.
No comments:
Post a Comment