मुंबईतील प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई - मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील नागरिकांसाठी विकास, सुविधा तसेच सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (Complete the ongoing projects in Mumbai on time)

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासु, डॉ. अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

आज आढावा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसर विकास, हाजीअली दर्गा परिसर विकास, वरळी, माहिम आणि कफ परेड कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, शाळांच्या इमारतींची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी सुविधा केंद्र उभारणे, व्यावसायिक रस्त्यांवर रात्री फुडकोर्ट सुरू करणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करणे, कमी दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे, बाजारपेठा अद्ययावत करणे आदी विषयांचा समावेश होता.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई शहरात यासाठी दहा ठिकाणे निश्चित करून प्राधान्याने या केंद्रांचे काम सूरू करावे. ज्येष्ठ नागरिकांना येथे ने-आण करण्यासाठी बेस्टमार्फत इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर (सुविधा केंद्र) सुरू करून तेथे त्यांच्यासाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून द्यावीत. महालक्ष्मी, मुंबादेवी आणि हाजीअली परिसराच्या विकासाची सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. नवरात्रीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोळीवाड्यामध्ये कायमस्वरूपी तसेच व्यावसायिक रस्त्यांवर व्यवसाय संपल्यानंतर मुंबईचे वैशिष्ट्य जपणारे फुड कोर्ट सुरू करावेत, याद्वारे रोजगार निर्मिती देखील करता येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

ओला आणि सुका कचरा विलगीकरणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात यावा. मुंबईतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे जेथे पार्किंगची सोय नाही अशा ठिकाणी कमी दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही केसरकर यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments