मुंबई - सरकारने २०२२- २३ या काळात एक रुपयांचीही औषध खरेदी केली नसल्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे.
हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाला २०२२- २३ मध्ये १०८ कोटी रुपयांच औषध खरेदीच कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र त्यातील फक्त ५० कोटीच रुपये हाफकीन ला देण्यात आले आहेत. यामुळे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय कोणतीही कंपनीच औषध खरेदी करणार नाही अशी भूमिका हाफकीन संस्थेने घेतल्याची माहिती हाफकीन च्या अधिकारी वर्गासोबत घेतलेल्या बैठकीत मिळाल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
सरकार दीडशे कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करते. मात्र औषध खरेदीसाठी पैसे देत नाही. सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून मृत्यू घरोघरी पाठवते की काय असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमणुकीला दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होतो व त्याच्या विरोधात नोटीस काढूनही सरकारला जुमानत नाही अशा अधिकाऱ्याच्या हाती राज्याची कायदा व सुव्यवस्था जाता कामा नये अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी, यासाठी या आठवड्यभरात विमा कंपन्यांच्या दारात जाऊन जाब विचारणार अशी भूमिका शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतली असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment