माणुसकीचा विचार वारकरी संमेलनातून समाजात रुजवा - शरद पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2023

माणुसकीचा विचार वारकरी संमेलनातून समाजात रुजवा - शरद पवार


आळंदी - भागवत वारकरी संमेलन ही संकल्पनाच मुळी समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे. अशा वारकरी संमेलनातून माणुसकीचा संदेश समाजात रुजायला हवा, असे मत राष्ट्रीय नेते, पद्मविभूषण  शरद पवार यांनी आळंदी येथे व्यक्त केले. आळंदी येथील राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनात ते बोलत होते.

आळंदी, च-होली फाटा येथील मुक्ताई लाॅन येथे राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलन रविवारी संपन्न झाले. यावेळी शरद पवार यांच्या सोबत खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्षपद ह.भ.प. भुकेले शास्त्री महाराज यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांनी केले, तर संमेलनाचे मुख्य संयोजक विकास लवांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की,  आज समाजामध्ये अस्वस्थता वाढली आहे. ती काढून टाकण्यासाठी, त्याला मानसिक समाधान देण्यासाठी, त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जे काही पर्याय आज समाजासमोर आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आज देशामध्ये अन्याय, अत्याचार वाढल्याचे  चित्र दिसत आहे. धर्माच्या आधारे कर्मकांडाचे स्तोम माजविले जात आहे. माझ्या मते, कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचा पुरस्कार कधी करत नाही, चुकीचे संस्कार कधी समाज बांधवांवर करत नाही. हा देश अनेक जाती-धर्माचा व भाषेचा असला तरी विविधतेत एकता जपणारा आहे. आज हा एकतेचा विचार रुजवणं आणि तो शक्तिशाली करणं याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो याची मला खात्री आहे, असेही शरद पवार म्हणाले.

संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले की, सातशे वर्षांपूर्वी या देशात जात धर्माच्या नावाने समाजात दुभंगला होता, कर्मकांडाचे स्तोम माजले होते, तेव्हा संत नामदेव महाराज यांनी पंढरपूरच्या वाळवंटात कर्मकांडविरहीत, समताधिष्टित वारकरी चळवळ उभी केली. आणि समाज जोडण्याचे काम केले. आज पुन्हा समाजामध्येत फूट पाडण्याचे, वातावरण अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहे. ते रोखायचे असतील, समाज एकसंघ ठेवायचा असेल तर विचार हाच एकमेव पर्याय आहे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भुकेले शास्त्री यांनी आपली भूमिका लेखी भाषणात सविस्तर मांडली.  तर छोटेखानी भाषणात भागवत धर्म आणि सनातन धर्म यातील फरक स्पष्ट केला. विकास लवांडे यांनी अत्यंत समयसूचकतेने सूत्रसंचालन करून कार्यक्रम नियोजन वेळेत संपेल याची काळजी घेतली. उद्धव महाराज शिंदे यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी केले. दु:शासन महाराज क्षीरसागर यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीने मान्यवरांना संत पिठापर्यंत आणले. भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी शरद पवार यांना दिलेल्या कृतज्ञता पत्राचे वाचन केले. देवराम महराज कोठारे, निरंजन महाराज सोखी, सुरेश महाराज भालेराव, सतीश काळे, राजू भुजबळ, समाधान महाराज देशमुख, शंकर बहिराट, मुबारकभाई शेख यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad