सायन रुग्णालयात तरुणाच्या मानेतून काढली सव्वादोन किलो वजनाची गाठ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2023

सायन रुग्णालयात तरुणाच्या मानेतून काढली सव्वादोन किलो वजनाची गाठ


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार (सायन) रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक तरुण उपचारांसाठी आला. तो आला तेव्हा त्याच्या जन्मापासून खांद्यावर आणि मानेजवळ असणारी गाठ वाढत वाढत आता वयाच्या १५ व्या वर्षी सव्वादोन किलोची झाली होती. त्या गाठीमुळे त्याला प्रत्यक्ष त्रास होत नसला, तरी दिसायला विद्रुप दिसणा-या त्या गाठीचा तरुणाच्या व्यक्तिमत्वावर प्रतिकूल परिणाम होत होता. त्याचबरोबर भविष्यात ती गाठ अधिक मोठी होऊन त्याचे अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता होतीच‌. (A tumor weighing 2 kg was removed from the young man's neck)

त्या गाठीची होणारी वाढ आणि आकार बघून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, असं रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितलं.‌ त्या अत्यंत अवघड आणि जटिल शस्त्रक्रियेतील संभाव्य धोक्यांची ज़ाणीव रुग्ण तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांच्या सहमतीनंतर व आवश्यक त्या वैद्यकीय उपचारक्रमानंतर त्या तरुणावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. शीव रुग्णालयातील 'सुघटन शल्यचिकित्सा' अर्थात 'प्लास्टिक सर्जरी' विभागासह इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत अवघड आणि नाजूक असणारी ही शस्त्रक्रिया केली. तब्बल साडेसहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेअंती जन्मापासून असलेली त्या तरुणाच्या मानेवरची गाठ काढली गेली. त्यानंतर त्याच्या खांद्यावरील ते 'ओझे' मोकळे झाले आहे. आता त्याची तब्येत सुधारत असून तो पूर्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध आरोग्य व‌ वैद्यकीय सेवा सुविधा महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येत असतात. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांद्वारे विविध वैद्यकीय उपचार देण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. शीव परिसरात असणारे लोकमान्य टिळक सर्व उपचार रुग्णालय हे देखील त्यापैकी एक. याच रुग्णालयात १५ वर्षीय तरुणाच्या मानेवरील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर २०२३ रोजी या १५ वर्षीय तरुणाच्या मानेवर डाव्या बाजूला जन्मापासून गाठ असल्याने उपचाराकरीता आणण्यात आले. ही गाठ हळूहळू वाढत होती. परंतू त्याचा रुग्णास त्रास नव्हता. रुग्ण तपासणी करीता आला असता ही गाठ '२२ सेंटीमीटर x ३० सेंटीमीटर' इतकी वाढली होती. या गाठीमुळे रुग्णाची श्वसन-नलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला पूर्णपणे झुकली होती. सुदैवाने रुग्णास श्वासोच्छवासास त्रास होत नव्हता. रुग्णाच्या आवश्यक रक्त व इतर तपासण्या करण्यात आल्या असता ही गाठ म्हणजे 'लिम्फॅटिक सिस्टिम' व रक्त वाहिन्या यांचे जाळे आहे, असे 'एमआरआय' तपासणीत आढळून आले. ही गाठ मानेतील एक मुख्य रक्त वाहिनी (नीला) म्हणजेच 'इंटर्नल जुगुलर व्हेन' या शिरेपासून वाढत होती.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी 'सुघटन शल्य चिकित्साशास्त्र चिकित्सक' (प्लॅस्टिक सर्जरी), उरोशल्य चिकित्साशास्त्र चिकित्सक (सी.वी.टी.एस.), व्हॅस्क्युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांनी सखोल चर्चा करुन व त्यातील धोके अधोरेखित करुन शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाच्या जीवास धोका असल्याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांस संपूर्ण कल्पना दिली. त्याचबरोबर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या कुटुंबीयांनी लेखी संमती घेण्यात आली. तसेच पुरेशा रक्ताची तरतूद करुन उरोशल्य चिकित्साशास्त्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. 

त्यानुसार गेल्याच आठवड्यात संपूर्ण तयारीनिशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अंदाजे साडेसहा तास सुरू होती. शस्त्रक्रिये दरम्यान गळ्याभोवती असणा-या इतर अतिशय महत्त्वाच्या रक्त वाहिन्या, चेतापेशी आणि मांसपेशी यांना कुठेही धक्का न लावता कौशल्याने पार पाडण्यात आली. ही गाठ जवळजवळ ५ पाउंड (सव्वा दोन किलो) वजनाची होती. आता गाठ काढल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. अत्यंत अवघड आणि कठीण असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याबद्दल  रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांनी शीव रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

या शस्त्रक्रियेसाठी कार्यरत चमूमध्ये प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुकुंद जगन्नाथन, डॉ. अमरनाथ मुनोळी, सी.वी.टी.एस. सर्जन डॉ. जयंत खांडेकर, व्हॅसक्युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे डॉ. विवेक उकीर्डे, भूलतज्ञ डॉ. शकुंतला बसंतवानी, डॉ. खुशबू कडकिया, डॉ. अश्विनी रेड्डी, डॉ.‌ नयना, डॉ. देवेंद्र ठाकूर, डॉ‌. नेहा, डॉ. क्षितिजा, डॉ. मनिषा खरात, डॉ. नवल जेठालिया या तज्ज्ञांचा समावेश होता. त्याचबरोबर राजश्री, शोभा आणि प्रणीत, दीपक, संदेश, गणेश आणि लव या कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य या शस्त्रक्रियेला लाभले, अशी माहिती लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad